
शिवसेनेचा दसरा मेळावा विराट आणि विशाल होणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. परंपरेत खंड पडू नये, यासाठी शिवसैनिक वादळ, वारा, उन, पाऊस, सर्व संकटे तुडवत शिवतीर्थावर दाखल होत आहेत, हीच निष्ठावंतांची आणि परंपरेची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. मुंबईसह राज्यात अतिवृष्टी झाली आहे. मुंबईतही जोरदार पाऊस होत असल्याने शिवतीर्थावरही पाणी साचले होते. मात्र, शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच व्हावा, यासाठी असंख्या शिवसैनिक शिवतीर्थावरील पाणी बाहेर काढणे, चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणे यासाठी मेहनत घेत आहेत. खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, सर्व पदाधिकारी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या कामांकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा विराट आणि विशाल होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या परंपरेत खंड पडू नये, यासाठी शिवसैनिक झटत आहेत. अतिवृष्टी, चिखल असेल, वादळ असेल किंवा इतर काही संकट असतील हा मेळावा विराट आणि विशाल व्हायलाच पाहिजे. विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे, विचारांचे सोने लुटले गेले पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेकडून दिशा मिळायला हवी, मार्गदर्शन मिळायला हवे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी राज्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचले आहेत. आणखी अनेकजण पोहचणार आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे शिवसेनेचा मेळावा विराट आणि विशाल होणार आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेना आणि मनसे यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेकदा चर्चा होते, दोघांमध्ये सुसंवाद सुरू आहे. मात्र, प्रसारमाध्यांना वाटते की, आताच सर्व भूमिका स्पष्ट व्हाव्या, पणे तसे होत नाही. मराठी माणूस, महाराष्ट्र हित, मराठी अस्मिता या दोन्ही पक्षांच्या भूमिका एक असल्या तरी दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. दोन्ही पक्षांकडून यावर ग्राउंड लेव्हलला काम सुरू केले आहे. यापेक्षा जास्त माहिती आपण देऊ शकत नाही. याबाबतची माहिती देण्याचे किंवा घोषणा करण्याचे अधिकार दोन्ही पक्षाच्या प्रमुखांचे आहे. ते याबाबत घोषणा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.