
सरकारचा मराठवाड्याचा पाहणी दौरा हा फार्स आहे. ते गेले कधी, पाहणी केली कधी, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश समजून त्यांच्याशी चर्चा केली कधी असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासेहब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. या संकटाच्या काळातही सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार मुर्दाड,असंवेदनशील आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
सरकारचा मराठवाड्याचा पाहणी दौरा हा फार्स आहे. ते गेले कधी, पाहणी केली कधी, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश समजून त्यांच्याशी चर्चा केली कधी असा सवाल संजय राऊत यांनी केला. हा 36 लाख शेतकऱ्यांच्या प्रश्न आहे. एका शेतकऱ्यांवर 10 जण अवलंबून आहेत. त्यामुळे मराठवड्यात 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. सुमारे 70 ते 70 लाख एकर जमीन उद्ध्वस्त झाली आहे, ती शेती करण्यालायक राहिलेली नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गावात काहीच शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी नेमके काय पाहिले? त्यांनी काय समजून घेतले? त्यांनी आतापर्यंत काय मदत पोहचवली? फक्त पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून ते दिले म्हणजे मदत होत नाही, ती प्रसिद्धी आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अशी प्रसिद्धी करण्याची गरज नाही. त्यांनी शासन म्हणून मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे आणि इतर मदत गुप्तपणे करण्यात यावी. ते अशा संकटाची वाट बघत असतात काय? अशी संकट येतात कधी आणि आम्ही मदत देतो कधी, याची ते वाट बघतात का? मदतीचे आम्ही स्वागत करतो. सध्या मदतीची गरज आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने काय केले. केंद्राने काय मदत केली? पाहणीसाठी कोणते पथक पाठवले. आधी 36 लाख शेतकऱ्यांपर्यंत घराघरात मदत पोहचवण्याची गरज आहे. हे सरकार मुर्दाड,असंवेदनशील आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पैशांचं सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका, ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नये, या पूरात लाडक्या बहिणींचे संसार वाहून गेले आहेत. पैशांचे सोंग आणता येत नाही, असे सांगण्याची वेळ सरकारच्या दरोडेखोरीमुळे आली आहे. या सरकराने 10 लाख कोटींचे कर्ज केले आहे. त्यांना कोणीही कर्ज देण्यासाठी तयार नाही. घेतलेल्या कर्जावर 65 हजार कोटींचे व्याज भरण्यात येते. अशा परिस्थितीत मराठवड्यावर आलेल्या संकटातून ते कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार दमडीचीही मदत करायला तयार नाही. अशा परिस्थितीत सरकार काय करणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कसे जगायचे, हा मोठा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरपासून संभाजीनगरपर्यंत आज दौरा करत आहेत. परिस्थिती समजून घेत, काय करता येईल, शेतकऱ्यांचा आवाज कसा उठवता येईल, सरकारला जाब विचारत कसे धारेवर धरता येईल, याचा विचार करण्यात येईल. सरकारने विरोधी पक्षनेता ठेवलेला नाही. तो प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल या भीतीनेच त्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेताच ठेवलेला नाही. अशा सरकारकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायच्या, असा सवालही त्यांनी केला.
आम्ही कोरोनाच्या संकट काळात एका महिन्याचे वेतन द्यावे आणि मुख्यमंत्री सहायता निधी द्यावा,असे ठरवले. त्यावेळी भाजपच्या उपटसुभांनी आम्ही मुख्यमंत्री सहायता फंडात भ्रष्टाचार होऊ देणार नाही, असे सांगत पीएम केअर फंडात पैसे पाठवले. तर मग आता ते मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देत आहेत. ते ढोंगी आणि बकवास लोकं आहेत. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. आम्ही काय करणार आहोत, ते आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करतील, आम्ही काय करणार, हा प्रश्न त्यांना विचारण्याचा अधिकार नाही. सरकार काय करणार, हा जनतेचा प्रश्न आहे. ते मदत जाहीर करून काही उपकार करत नाहीत, असेही त्यांनी सरकारला सुनावले.
मुंबईतील एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार बघता, त्यांचे कपडे झटकले तरी 5-10 हजार कोटी सहज निघतील. लाडक्या बिल्डरांच्या नेमलेल्या टोळ्या, एसआरएवाले लाडके बिल्डर यांच्याकडून लूट सुरू आहे. निवडणुकीवर ते एकएक लाख कोटी खर्च करत आहेत. मात्र, मराठवड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसा नाही. मराठवड्यावर याआधी अशी वेळ आली नव्हती, ही भीषण परिस्थिती लक्षात घेत सरकारने मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की, भाजपचे सर्व लोक पाठ दाखवून पळून जातात. त्यावेळी भाजपवाले संकटमोचक नसून दरोडेखोर असतात, अशी टीकाही त्यांनी केली.