
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेत बावनकुळेंनी फोन टॅपिंगची कबुली दिली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याची दखल घेत चौकशी होणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राज्य सरकारमधील भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या फोन सर्व्हिलन्सबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी इंडियन टेलिग्राफ अक्टखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करत त्यांची चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी पॅगेससचे कोणते मशीन आणले आहे, ते भाजप कार्यालयात लावले आहे काय? काही खाजगी लोक, संस्था यासाठी लावल्या आहेत का? हा विषय फक्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संबंधित नसून विरोधी पक्षाचे फोनही टॅप करून एकले जात आहेत. त्यांचे व्हाटस् अॅप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितले आहे. बावनकुळे आणि त्यांची भजपची टीम रवींद्र चव्हाण, मुंबईतील काही बिल्डर, नागपूरातील काही यंत्रणा यांनी वॉर रुम सुरू केले आहे. त्यातून भाजप, मिंधे, अजित पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशा सर्व पक्षांच्या नेते त्यांच्या सर्व्हिलन्सवर आहेत. हे बेकायदेशीर, घटनाबाह्य कृत्य आहे. आमच्या खासगी जीवनात घुसण्याचा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले.
याआधी महाविकास आघाडी सरकार येत असतानाही असे प्रकार झाले आहेत. त्याबाबत आम्ही गुन्हे दाखल करत चौकशी सुरू केली होती. मात्र, सरकार बदलल्यामुळे या सर्वांना क्लीन चिट देण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखत करत चौकशी केली पाहिजे. त्यांच्या व्हिजिलन्सवर पत्रकार, विरोधक, फडणवीस यांचे विरोधक सर्वजण आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे या यंत्रणा आल्या कोठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.



























































