आठ दिवसात पाणीप्रश्न सुटला नाही तर शिवसेना स्टाईलनी आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील कल्याणरोड परिसरातील निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे तसेच पिण्याच्या पाणीचे टँकर वाढवून देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा नेला होता. येत्या 8 दिवसात पाणी टंचाईवर उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक शाम नळकांडे यांनी दिला.

शहराजवळचा परिसर असलेला कल्याणरोड भागात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. या भागात 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. तसेच नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो. मात्र टँकरचालक नियमित खेपा करत नाही. नागरिकांशी अरेरावीने वागतो. नागरिकांना सर्व कामे सोडून टँकर येण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या परिसरातील नगरसेवकांना समस्या सांगितल्या. नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला सूचना देवूनही परस्थितीत सुधारणा न झाल्याने नगरसेवक शाम नळकांडे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे, राम नळकांडे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांचा मोठा सहभाग होता. पिण्याच्या पाणी प्रश्नावर नागरिकांनी उपायुक्त प्रदीप पठारे यांना घेराव घालून त्यांच्याशी चर्चा केली.

चर्चेवेळी महिलांनी जे पिण्याचे पाणी आठ दिवसांनी येते ते दुषीत पाणी एका बाटलीमध्ये भरून आणले. ते उपायुक्त प्रदीप पठारे व महादेव काकडे यांना दाखवले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले नगर महापालिकेतील प्रभाग 8 मधील कल्याणरोड परिसरातील पिण्याच्या पाणीची टंचाई होत आहे. महापालिकेत यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आमच्या परिसरातील पिण्याच्या पाणीची टंचाई दूर झाली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव पालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी यावे लागले. तसेच झालेल्या चर्चेप्रमाणे येत्या आठ दिवसात कल्याणरोड परिसरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधांचे प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यावर कल्याणरोड परिसरातील नागरिकांच्या वतीने पूर्वसूचना न देता महापालिकेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त प्रदीप पठारे म्हणाले की, मी नागरिकांना आवाहन करतो कि कोणत्याच नागरिकांनी पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकाला पैसे देऊ नये. तसेच आतापासून पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकासोबत महानगरपालिकेचा कर्मचारी ठेवण्यात येणार आहे.