
जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात गुरुवारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. या रुग्णालयात रुग्णांची कुठल्याही प्रकारे हेळसांड होता कामा नये, बदली झालेल्या डॉक्टरांना पुन्हा येथे घेऊ नका, रुग्णसेवेतील बेफिकिरी कदापि खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना विधानसभा संघटक, स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात रुग्णसेवेत निष्काळजीपणा केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी गुरुवारी दुपारी तातडीची बैठक बोलावली. यावेळी अनेक नागरिकांनी रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तक्रारी आणि सूचना केल्या. यापूर्वी कारवाई होऊन बदली झालेल्या डॉक्टरना पुन्हा येथे घेऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली. त्याला अनुसरून कारभारात सुधारणा करण्याच्या आणि बदली झालेल्या डॉक्टरांना पुन्हा या रुग्णालयात न घेण्याच्या सक्त सूचना आमदार नर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. यावेळी ट्रॉमा केअर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर तसेच शिवसेनेचे विधानसभा पदाधिकारी रवींद्र साळवी, विधानसभा समन्वयक के. एल. पाठक, उपविभागप्रमुख जयवंत लाड, महिला विधानसभा समन्वयक लोना रावत, संदीप गाढवे, बाळा तावडे, नंदकुमार ताम्हणकर, प्रदीप गांधी, समीक्षा माळी, संजय सावंत, विशाल येरागी, मधुकर जुवाटकर, प्रियांका आंधळे, उत्तरा नायर, अजय प्रधान, वैभव कांबळे, कृपा, अविनाश रासम आदी उपस्थित होते.
रुग्णालय प्रशासनाला महिन्याचा अल्टिमेटम
रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे, डॉक्टर उपलब्ध नसणे तसेच अपघात विभाग, ट्रॉमा विभाग, ओपीडी, आयसीयू, एक्स-रे मशीन, पॅथोलॉजी, ऑर्थोपेडीक, मेडिसिन, गायनॅक, कार्डिओ, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी वेतन यासंबंधी विविध प्रश्नांवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार नर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यासाठी प्रशासनाला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.