बीड नगर पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार; शिवसैनिकांना विश्वास

बीडच्या जनतेने कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरुन शिवसेनेला मनात स्थान दिले आहे. मध्यंतरी विरोधकांनी थोडे डोके वर काढले होते. मात्र, भविष्यात होणाऱ्या नगर पालिकेत निवडणुकीत बीड नगर पालिकेवर भगवाच फडकणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. शहरातील विविध ठिकाणी स्थापन झालेल्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेत येणाऱ्या युवकांना घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले. डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, युवकांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे शिवसेनाच आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणाला आम्ही साथ देवू असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे संघटन वाढवण्याच्या दृष्टीने आणि बाळासाहेबांचे विचार जनमानसात रुजवण्याच्या हेतूने बीड शहरातील प्रभाग 15, प्रभाग 3, प्रभाग 9, प्रभाग 1 मध्ये दोन अशा शिवसेनेच्या पाच शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, न.प.सभापती भीमराव वाघचौरे, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, जिल्हा विधानसभा समन्वयक नितीन धांडे, जिल्हा संघटक रतन गुजर, नगरसेवक किशोर पिंगळे, भास्कर जाधव, बिभीषण लांडगे, माजी नरगसेवक शिवाजी जाधव, सुशिल पिंगळे, बाळासाहेब वाघचौरे, कल्याण कौचट, सखाराम देवकर, सुमंत रुईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी उपस्थित तरुण शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, बीड हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राहिला आहे आणि तो यापुढेही कायम राखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तुम्ही आज तळमळीने शिवसेनेत पदाधिकारी म्हणून समाविष्ट झाला आहात ती कौतुकास्पद आहे. शिवसेनेत शिवसैनिक हेच पद सर्वोच्च आहे. शिवसैनिक हा निडर असतो आणि तुम्हीही कुणाच्या दबावाला बळी न पडता शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार तळागाळात रुजवण्याचे काम करा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना असून शिवसेनेत येणाऱ्या युवकांना घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या