
मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा धोबीपछाड देत पालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवला आहे. वैधानिक समित्यांपैकी आज झालेल्या निवडणुकीत स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव, तर शिक्षण समितीवर संध्या दोशी यांची बहुमताने निवड झाली. यशवंत जाधव यांची सलग चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपदी तर संध्या दोशी यांची सलग दुसऱया वेळी शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाली.
पालिकेच्या वैधानिक समिती अध्यक्षपदासाठी दरवर्षी एप्रिलमध्ये होणारी निवडणूक आज कोरोना खबरदारी घेऊन पार पडली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत यशवंत जाधव यांना 14 मते मिळाली, तर भाजपच्या राजश्री शिरवडकर यांना केवळ 8 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 27 सदस्यांपैकी 22 सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. तीन जण तटस्थ राहिले. एका सदस्याला मतदानाचा अधिकार नव्हता. या निवडणुकीत यशवंत जाधव यांनी भाजपच्या राजश्री शिरवडकर यांचा 6 मतांनी दणदणीत पराभव केला. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या संध्या दोशी यांना 13 मते मिळाली, तर भाजपचे पंकज यादव यांना 9 मते मिळाली. त्यामुळे दोशी यांनी यादव यांचा 4 मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी 22 सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. चार जण तटस्थ राहिले.
राष्ट्रवादी, ‘सपा’ शिवसेनेसोबत; काँग्रेसची माघार
वैधानिक समित्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. यानुसार निवडणुकीत दोन्ही पक्षांनी शिवसेनेला मतदान केले. तर निवडणुकीआधी काँग्रेसने दोन्ही समित्यांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले. काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरिया आणि शिक्षण समितीसाठी आशा कोपरकर यांनी अर्ज दाखल केले होते.
सलग दुसऱया वेळी संधी मिळाल्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. यामध्ये अद्ययावत शिक्षण देण्यासाठी अभिनव उपक्रम आणि शाळा-शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊन काम करणार आहे.
– संध्या दोशी, अध्यक्षा, शिक्षण समिती
‘बेस्ट’, सुधार समितीवर शिवसेनेचा विजय निश्चित
वैधानिक समित्यांपैकी सुधार आणि ‘बेस्ट’ समिती अध्यक्षपदासाठी उद्या मंगळवारी निवडणूक होत आहे. यामध्ये सुधार समितीसाठी शिवसेनेकडून सदानंद परब आणि ‘बेस्ट’ समितीसाठी आशीष चेंबूरकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असून राष्ट्रवादी, ‘सपा’ने आधीच पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस उमेदवारी मागे घेऊन तटस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.
मुंबईकरांसाठी जास्तीत जास्त सेवा-सुविधा देण्यासाठी काम सुरूच ठेवणार आहे. निवडणुकीआधी मुंबईकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यावर भर राहील. कोरोनाला रोखण्याला प्राधान्य देताना आरोग्यासाठी जादा निधीचा वापर केला जाईल. नागरिकांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी प्रयत्न करून विश्वास सार्थ करून दाखवणार.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती
निवडणुकीनंतर महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.






























































