जालन्यात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जालना

जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक अ‍ॅड. भास्कर मगरे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला अंबड चौपुली येथून सुरुवात झाली होती. मोर्चेकरी हजारोच्या संख्येने असल्याने लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शिवसेना जिंदाबाद….आमच्या हक्काचे न्याय आम्हाला द्या… अशा गगनभेदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय पड गायरान जमिनीवरील दलित आदिवासी भुमीहिन कास्तपट्टे नावे करुन सातबारा देण्यात यावा. जालना तालुक्यातील मौजे नाव्हा येथील वयोवृध्द आदिवासी महिला सुभाबाई खंडू गायकवाड यांची समृध्दी महामार्गात संपादीत जमिन मावेजातून तलाठी कळवुंबे याने केलेल्या सहा लाख रुपयांची केलेली फसवणुक रक्कम त्या महिलेस परत मिळवून देण्यात यावी व तलाठी कलवुंबे याच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नागपुर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती समृध्दी महामार्ग जालना जिल्ह्यात बदनापूर व जालना तालुक्यातील 25 गावे आणि 510 हेक्टर जमीन समृध्दी महामार्गाचे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जालना आणि भुमिअभिलेख उपअधिक्षक जालना यांच्या संगनमताने बोगस पंचनाम्यातून शेतकरी व शासनाचे कोट्यावधींची फसवणुक, अफरातफरी व भ्रष्टाचाराची मोक्यावर जावून चौकशी करण्यात यावी. भोकरदन तहसिलकडून 2013-14 मध्ये हजारो निराधार लाभार्थांना बोगस मंजुरी पत्र देवून फसवणुक केलेल्या तत्कालीन निराधार कमिटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन बोगस अनुदान मंजुरी पत्र दिलेल्या निराधारांना डिसेंबर 2013 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत निराधार अनुदान देण्यात यावे. आदी मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हृयातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तकरी आणि वंचित बेघर निराधारांच्या हक्कासाठी शिवसेना दलित आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. त्यामुळे आज शिवसेना दलित आघाडीच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, असेही शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी म्हटले आहे.

जालना जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने तात्काळ रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन गव्हाणीमध्ये चारा देण्याची व्यवस्था करण्यात यावी या व इतर मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने घ्यावे. अन्यथा शिवसेना दलित आघाडीच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्च्यात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक अ‍ॅड. भास्कर मगरे, अंबड तालुकाध्यक्ष तुळशीदास पटेकर, परतुरचे मधुकर पाईकराव, घनसावंगी जय खराम आदींसह हजारो भुमीहिन, कास्तकर, बेघर, बेरोजगार आदींची उपस्थिती होती.