शिवशक्ती, जयभारतची उपांत्य फेरीत धडक

शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडाळा विधानसभा आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कबड्डी महोत्सवात पुरुषांच्या ‘अ’ गटात शिवशक्ती, जय भारत, सिद्धिप्रभा, गुड मॉर्निंग या मंडळांनी उपांत्य फेरी गाठली तर ‘ब’ गटाच्या अंतिम फेरीत महालक्ष्मी आणि जय भवानी यांच्यात झुंज रंगणार आहे.

शिवशक्ती महिला संघाच्या सहकार्याने भोईवाडय़ाच्या सदाकांत ढवण क्रीडांगण येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुषांच्या ‘अ’ गटात शिवशक्ती क्रीडा मंडळाने शिवनेरीचा 26-22 असा पराभव केला. जय भारत मंडळाने अशोक मंडळाचा 44-13 असा धुव्वा उडवला. तसेच सिद्धिप्रभा फाऊंडेशनने विकास क्रीडा मंडळाचा 38-23 असा सहज पराभव केला. मात्र विजय नवनाथ आणि गुड मॉर्निंग यांच्यातील लढत 28-28 अशी बरोबरीत सुटल्यानंतर पाच-पाच चढायांच्या डावात गुड मॉर्निंगने 6-5 अशी बाजी मारली.

पुरुषांच्या ‘ब’ गटात महालक्ष्मी मंडळाने यश क्रीडा मंडळाचा 31-30 असा अवघ्या एका गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. तसेच दुसऱया उपांत्य लढतीत जय भवानी स्पोर्ट्स क्लबने संस्कृती प्रतिष्ठानला 49-33 असे नमवले. महिलांच्या व्यावसायिक गटात रुबी कन्स्ट्रक्शनने एनफिल्ड टॉवरचा 42-13 असा फडशा पाडला तर बँक ऑफ बडोद्याने मुंबई महानगरपालिकेचा 38-17 असा धुव्वा उडवला.