संतापजनक! ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून पोत्यात भरून फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला पोत्यात कोंडून विहिरीजवळ फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी उताई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर जवळच असलेल्या एका दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित असलेला आरोपी धनेश्वर (३५) याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. सुमारे दोन तास शोध घेल्यानंतर गावातील दोन तरुणांना एका विहिरीजवळ पडलेल्या पोत्यात काहीतरी हालचाल जाणवली. त्यांनी पोते उघडले असता, चिमुरडी आत आढळून आली. तिचे तोंड उशीच्या कव्हरने दाबण्यात आले होते.

याप्रकरणी बोलताना पाटण क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) अनुप लाक्रा यांनी सांगितले की, “मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.” दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपस करत आहे.