
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गॅस्ट्रो रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. यामुळे आरोग्य केंद्रातील कामकाजावर टीकेचा भडीमार होत असतानाच खोडाळा आरोग्य केंद्रातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य केंद्रातील बेडवर रुग्णाऐवजी कुत्रा झोपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य केंद्रातील कुत्र्याच्या मुक्कामामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात सुसज्ज आरोग्य व्यवस्था नाही. त्यामुळे येथील रुग्णांना जव्हार, ठाणे, नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागते. दोन दिवसांपूर्वी २८ हून अधिक जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. रुग्णांना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र या ठिकाणी योग्य उपचार न मिळाल्याने मोखाडा आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे खोडाळा आरोग्य केंद्राच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा खोडाळा आरोग्य केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.




























































