उल्कानगरीत शॉर्सर्किटने आग, दहा वर्षाच्या मुलाचा गुदमरून मृत्यू

510

उल्कानगरी परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबीयाच्या घरात शॉर्टसर्किटने एलईडी आणि सोलारच्या उपकरणांनी अचानक पेट घेतला. या भीषण आगीच्या धुरात गुदमरलेल्या चौघांजणापैकी संस्कार शामसुंदर जाधव या दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरूवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली.

उल्कानगरीतील साई रत्न पेट्रोल पंपामागे अविनाश पाठक यांच्या घरात शामसुंदर बाबासाहेब जाधव(45) हे पत्नी सविता (40), मुलगी संस्कृती (19) मुलगा संस्कार (10)आपल्या कुटुंबासह राहतात. जाधव हे मूळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील आहे. गेल्या वर्षभरापासून ते एलईडी व सोलार ऊर्जा उपकरण विक्रीचा व्यवसाय करत आहेत. बुधवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले असताना शॉर्टसर्किटमुळे घराच्या पाठीमागील खोलीत अचानक आग लागली. त्यामुळे एलईडी बल्ब आणि सोलार ऊर्जा उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे घरात आणि परिसरात धुराचे लोळ पसरले. धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. दुसऱ्य़ा मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील वीज पुरवठा ही खंडीत झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलिसांना कळवण्यात आली. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल दाखल झाल्यावर जाधव कुटुंबीयांच्या बचावासाठी दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत ते चौघेही बेशुध्द झाले होते. त्याच अवस्थेत त्यांना तात्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत संस्कारचा गुदमरुन मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या