मोदींचा दौरा चार दिवसांवर असतानाच मेट्रोच्या सांताक्रुझ स्थानकात शॉर्टसर्किट

भुयारी मेट्रो – 3 च्या पूर्ण मार्गाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत असतानाच आज आरे जेव्हीएलआरहून वरळी आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या दिशेने चाललेल्या मेट्रो ट्रेनमध्ये सांताक्रुझ स्थानकाजवळ शॉर्टसर्किट झाले आणि एकच घबराट पसरली. ट्रेनमधील प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकात खाली उतरवले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या गोंधळात 15 ते 20 मिनिटे वरळीकडे जाणारी मेट्रो ट्रेन सेवा ठप्प झाली.

आरे जेव्हीएलआर स्थानकातून वरळी आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या दिशेने ट्रेन जात होती. याचदरम्यान दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी विलेपार्ले येथील सीएसएमआय-विमानतळ टी–2 ते सांताक्रुझ मेट्रो स्थानकादरम्यान ट्रेनमध्ये शॉर्टसर्किट झाले. ट्रेनमधून ठिणगी उडाल्याचे दिसताच सर्वांमध्ये घबराट निर्माण झाली. तातडीने सर्व प्रवाशांना अलर्ट करण्यात आले आणि आगीची दुर्घटना रोखण्याच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता बाळगली. प्राधान्याने त्या ट्रेनमधील प्रवाशांना सांताक्रुझ स्थानकात सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि संपूर्ण ट्रेन रिकामी करण्यात आली. त्यानंतर त्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमधून पुढच्या स्थानकात हलवण्यात आले. यादरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. काही प्रवासी सुरक्षेच्या भीतीने थेट भुयारी मेट्रो स्थानकातून बाहेर गेले. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. शॉर्टसर्किटमुळे थांबवलेली मेट्रो ट्रेन पुढील तपासणीसाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील लूपलाईनवर मार्गस्थ करेपर्यंत मेट्रो सेवेचे नियमित वेळापत्रक कोलमडले. यात प्रवाशांची गैरसोय झाली.

सदोष वायरिंगचा संशय

‘ऍक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेवर रोज ट्रेनच्या 244 फेऱ्या चालवल्या जातात. यातून हजारो प्रवासी ये-जा करतात. शुक्रवारी बिघाड झालेल्या ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी होते. या ट्रेनमध्ये शॉर्टसर्किट कसे झाले, याचा सखोल तपास केला जात आहे. त्याच दृष्टीने तपासणी करण्यासाठी शॉर्टसर्किट झालेली ट्रेन बीकेसीतील लूपलाईनवर नेण्यात आली. ट्रेनमध्ये सदोष वायरिंगमुळे शॉर्टसर्किट झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.

सरकारविरोधात प्रवाशांमध्ये संताप

भुयारी मेट्रो प्रकल्पाचा मोठा दिखावा करताना राज्यातील महायुती सरकार सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत बेफिकीर राहिले आहे, असा संताप नियमित प्रवाशांनी व्यक्त केला. पावसाळय़ात वरळी मेट्रो स्थानकात पाणी साचले होते. त्यानंतर आता शॉर्टसर्किटच्या घटनेने अग्निसुरक्षेची गंभीर चिंता सतावत आहे. सरकारने विकासाचा दिखावा करण्याआधी सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. गेल्या महिन्यात मोनोरेल अर्ध्या मार्गात लटकली. त्यामुळे मोनोरेलची सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवली. त्यापाठोपाठ आता भुयारी मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशा स्थितीत भुयारी मेट्रोचा कफ परेडपर्यंतचा अंतिम टप्पा सुरू करण्याची घाई केली जात आहे. त्यामुळे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे.

गुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो सेवाही विस्कळीत

भुयारी मेट्रोप्रमाणेच मेट्रो-2 ए (दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो-7 (गुंदवली ते दहिसर) या मार्गिकांवरील मेट्रो सेवाही शुक्रवारी सायंकाळी विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गांवरील सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली. एमएमआरडीएने मात्र दोन्ही मेट्रो सेवांना ‘किंचित’ विलंब झाल्याचा अजब दावा केला.