
चुकीचे कृत्य केल्याने कुणावर ओरडणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. रागावल्यामुळे कुणी आत्महत्या करू शकेल अशी कल्पना कोणत्याही सामान्य व्यक्तीला करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आणि विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात शिक्षकाला दोषमुक्त करण्यास नकार देणारा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. वसतीगृहातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून शिक्षक ओरडले होते. त्याच नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली शिक्षकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांच्या कारवाईला आरोपी शिक्षकाने आव्हान दिले होते. तथापि, मद्रास उच्च न्यायालयात त्याला दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्याविरोधात शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती अमानुल्लाह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यामुळे शिक्षकाची आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. मृत विद्यार्थ्याने आधीचीच चूक पुन्हा करू नये, यासाठी आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला फैलावर घेतले होते. विद्यार्थी व शिक्षक यांच्यात कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नव्हती, असा युक्तिवाद अपिलकर्त्या शिक्षकाच्या वकिलांनी केला होता. तो युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
कोर्टाची निरीक्षणे
z या प्रकरणाचा संपूर्ण विचार केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणे आम्हाला योग्य वाटते. अपीलकर्ता शिक्षक विद्यार्थ्यावर ओरडला होता. हे कृत्य आत्महत्येस प्रवृत्त करणारे म्हणता येणार नाही.
z शिक्षक ओरडल्यामुळे विद्यार्थ्याने स्वतःचा जीव संपवला, अशी कल्पनाही कोणतीही सामान्य व्यक्ती करू शकणार नाही. दुसऱ्या विद्यार्थ्याने तक्रार केली असेल तर त्याची दखल घेत शिक्षकाने ओरडणे स्वाभाविकच आहे.