आला श्रावण…

shravan-utsav

उद्यापासून हिरव्यागार… प्रसन्न श्रावण महिन्याचे आगमन होत आहे…

 त्याच्या स्वागतासाठी कवितांशिवाय दुसरे काय असू शकते…

श्रावणमास          -बालकवी

श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;

क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.

वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं पुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;

तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे.

उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;

सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,

उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि का एकमतें.

फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती,

सुंदर हरिणी हिरव्या पुरणीं निज बाळांसह बागडती.

खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,

मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;

पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती

सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती.

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत

वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.

 आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी;

किती चातकचोचीने

प्यावा वर्षाऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला

गंध भरून कळ्यांत;

काळ्या डांबरी रस्त्याचा

झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब

ओंली चिरगुटें झाली;

ओल्या काwलारकाwलारीं

मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा

वाचतात ओले पक्षी;

आणि पोपटी रंगाची

रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,

वीज ओशाळली थोडी,

धावणाऱया क्षणालाही

आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा

जरा निवतात संथ;

येतां आषाढ-श्रावण

निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी;

किती चातकचोचीने

प्यावा वर्षाऋतू तरी!

  • बा.सी.मर्ढेकर

 श्रावण आला गं वनी श्रावण आला

दरवळे गंध मधुर ओला

एकलीच मी उभी अंगणी

उगीच पुणाला आणित स्मरणी

चार दिशांनी जमल्या

तोवर गणनी घनमाला

बरसू लागल्या रिमझिम धारा

वारा फुलवी मोर पिसारा

हलू लागली झाडेवेली

नाच सुरू झाहला

उरात नवख्या भरे शिर्शिरी

शिरशिर करी नृत्य शरीरी

सूर पुठून ये मल्हाराचा

पदर पुणी धरिला

समीप पुणी आले, झुकले

कती धिटावा ओठ टेकले

मृदुंग की ती वीज वाजते,

भास तरी कसला

आला श्रावण श्रावण.

– ग. दि. माडगुळकर