निमित्त – युगाचीही साथ आहे…

>>श्रीराम पचिंद्रे

पांढरपेशा वर्गाच्या कथित कवितेच्या सर्व प्रचलित संकल्पनांना छेद देत स्वतचं `विद्यापीठ’ कोणतं याचा शोध घेऊन, तिथं `शिकून’, कामगार वर्गाची कविता मराठीत प्रथमच घेऊन येणारे थोर कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे.

अनाथ म्हणून जन्माला आलेले, एका कामगार जोडप्यानं ज्यांचा सांभाळ केला त्या कविवर्य नारायण सुर्वे यांनी अगदी बालपणापासूनच कामगारांचं जग जवळून पाहिलं आणि अनुभवलं. त्यातूनच त्यांची कविता जन्माला आली. मी कोल्हापूरच्या नाईट कॉलेजमध्ये असताना अभ्यापामामध्ये सुर्व्यांची `शब्दांचे ईश्वर’ ही कविता अभ्यासाला होती. `कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते. निदान देणेकऱयांचे तगादे तरी चुकविता आले असते’ या ओळी वाचल्या आणि मी थरारून गेलो. प्राध्यापक भैरव कुंभार हे आम्हाला मराठी शिकवायचे. नारायण सुर्वे यांच्या कवितेची  माहिती आणि महती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कवितेचं एक वेगळंच विश्व माझ्यासमोर खुलं झालं होतं. कामगारांचं जग कसं असतं हे सुर्वे यांची कविता वाचून मला समजलं. पुढच्या काळात नारायण सुर्वे यांचा परिचय झाला. तो अधिकाधिक दाट होत गेला. सुर्वे कोल्हापूरला आल्यानंतर मी नेहमी त्यांची भेट घेत असे. आपण एक श्रेष्ठ कवी असल्याचा कसलाही तोरा ते मिरवत नव्हते. आरंभापासूनच मी त्यांना `दादा’ म्हणायला लागलो.

कामगारांच्या जीवनवेणा’ कवितेत प्रथमच प्रकट करणारा हा कवी. श्रमाशिवाय गमावण्यासारखं दुसरं काहीही नसणाऱया, म्हणूनच लढाऊ आणि श्रम विकून जगणाऱया कामगार वर्गातून पुढे येत, झोतभट्टीत शेकून निघावं तसं आयुष्य भाजून घेत नारायणाचं बालपण सरलं. कविता हा केवळ मध्यमवर्गीय जाणिवांचा प्रांत असल्याची समजूत असलेल्या समाजात कष्टकऱयांच्या वर्गातून नारायण सुर्वे कवी म्हणून पुढे आले. कळ्या, फुले, चंद्र, सूर्य, तारे, नद्या, झरे, वारे इत्यादी प्रतिमांच्या वेढय़ात गुरफटलेल्या कवितेला `भाकरीचा चंद्र’ नारायण सुर्वे यांनी दाखवला.क्रांतिकारक कामगार वर्गाशी जोडल्या गेलेल्या नारायणाची कविता ही यंत्रातून कापड निघावं तशी जन्माला येत गेली. मुंबईच्या कामगार जगात ते एकरूप झाले.

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटकाबाहेर कधी फाटका आत आहे
एकटाच आलो नाही, युगाचीही  साथ आहे
सावध असा, तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे

असे रोखठोकपणे सांगत नव्या युगाची, कामगारांची कविता सुर्वे यांनी एखाद्या लढवय्या  सैनिकासारखी उभी केली. `गिरगावचं साहित्य’ आणि `गिरणगावचं साहित्य’ असा भेद साहित्य विश्वात निर्माण झाला. कामगारांचं विश्व हे गोरगरीबांचं आणि अडाण्यांचं विश्व आहे, अशी मध्यमवर्गीय- पांढरपेशांच्या जगाची समजूत होती, पण कामगार वर्गाचं `विद्यापीठ’च निराळं होतं. हे `माझं विद्यापीठ’ सुर्व्यांनी शोधलं.

एकेकाळी कापड गिरण्या हाच प्रमुख धंदा होता. कष्ट विकून जगणं, शोषणाविरुद्ध लढणं एवढंच कामगारांना माहीत होतं. राजकीय आणि आर्थिक पिळवणुकीविरुद्ध लढणारा कवितेचा नायक नारायण सुर्वे यांना या गिरणगावातच सापडला. शोषणाविरुद्ध लढणाऱया या कामगाराची कविता नारायण सुर्वे यांनी समर्थपणे लिहिली.

विकता विकता त्यांनी सूर्य बाजारात आणला!
घर फुंकून निघालेले लोक पाहतच राहिले
अशा वेळी स्वस्त बसून कसे चालेल?
बघता बघता त्यांनी हातही बाजारात आणला
हाताची घडी घालूनच कसे चालेल?

असे अनेक प्रश्न सुर्व्यांच्या मनात निर्माण झाले. सुर्वे हे तरुण वयातच कम्युनिस्ट चळवळीत ओढले गेले. वैश्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून ते जीवनाला सामोरे गेले. मार्क्स – लेनिनवादाचा तिसरा नेत्र आपल्याला लाभला आणि या नेत्रानेच आपण समाजात वावरायला लागल्याचं ते सांगतात. कोणताही भ्रम न बाळगता वास्तवाला थेट जाऊन भिडण्याची आणि ज्याचं आकलन झालेलं आहे, त्या सर्व प्रश्नांची संगती लावण्याची सवय त्यांच्या बुद्धीला लागली. त्यातून त्यांची कविता टोकदार झाली.

बदल मागू पाहणाऱया निकराच्या झुंजीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणून सुर्वे समाजात ठामपणे उभे राहिले. विचारांच्या ताठ कण्यानं ते लढत राहिले. समाजाला गुलामासारखं राबविणाऱया व्यवस्थेशी त्यांनी कवितेचे शस्त्र बनवून लढा दिला. कारखान्याशी त्यांचं एवढं अभेद्य नातं होतं की, आपल्या आरंभीच्या लेखनाला ते `वाङ्मयीन कारखान्यातील’ उमेदवारी मानतात. त्यांनी शब्दांना चळवळीचं रूप दिलं.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे
झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन  दुःखात गेले

`नारायण सुर्वे’ नावाचा हा कामगारांचा कवी `नेहरू सोव्हिएत लँड पुरस्कारा’सह अनेक मानाच्या पुरस्कारांचा मानकरी ठरला. मराठीला वैश्विक पातळीवर घेऊन गेला. मराठी साहित्यविश्वात `सुर्वे मास्तर’ अशी स्वतची तप्त नाममुद्रा उमटवून पंचत्वात विलीन झाला.