
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट, 2023 ते गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून, या पारायण सोहळ्यात सुमारे 02 हजार 800 महिला व 01 हजार 200 पुरुष असे सुमारे 04 हजार पारायणार्थींनी सहभाग घेतला.
आज सकाळी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून श्रींच्या पोथी व फोटोची हनुमान मंदिर व व्दारकामाई मार्गे रथातुन श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथील पारायण मंडपापर्यंत श्रींच्या पोथी व फोटोची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी पोथी , उपकार्यकारी अभियंता संजय जोरी व दिनकर देसाई यांनी श्रींची प्रतिमा, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी विणा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुप्रिया यांनी कलश घेवून सहभाग घेतला.
गेट नंबर 04 पासून ते पारायण मंडपापर्यंत 25 पुरूष लकी ड्रॉ भाग्यवान साईभक्तांनी टप्या-टप्याने श्री साईबाबांची तसबीर घेऊन तर प्रत्येकी 17 महिला लकी ड्रॉ भाग्यवान साईभक्तांनी टप्या-टप्याने श्री साईबाबांची पोथी व कलश घेऊन सहभाग नोंदविला. या नविन्यपूर्ण उपक्रमामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, नाटय रसिक संचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन, श्री साईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी 7 ते 11.30 पुरूष वाचक व दुपारी 1 ते 5 महिला वाचक यांचे यावेळेत श्री साईसच्चरिताचे वाचन करण्यात आले. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत भक्ती संध्या सिध्दार्थ अवधुत थत्ते, पुणे यांचा मराठी व हिंदी भजन, अभंग भक्तीगितांचा कार्यक्रम व रात्रौ 7.30 ते 9 यावेळेत भटवाडी साईदर्शन भजन मंडळ, नितीनबुवा करगुटकर, मुंबई यांचा भक्तीगीत, भजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराच्या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात संपन्न झाला.


























































