।। श्री शंकरगाथा ।।; ‘अष्टावक्र’ रूपाचा संदर्भ

606

महाराष्ट्रभूमीवर अवतरलेल्या सिद्धसत्पुरुषांच्या अवतारकार्यातील लीलाप्रसंगांना शब्दबद्ध करणाऱया चरित्रग्रंथांमुळेच त्या त्या संतश्रेष्ठांचे मानवी देहातील ‘जीवन’कार्य वाचकभक्तांच्या समोर आले. विस्ताराने सांगायचे झाले तर, श्रीदत्तावतारांचे गुणवर्णन करणाऱया ‘श्रीपादवल्लभ चरित्र’ आणि ‘श्रीगुरुचरित्र’ या दोन ग्रंथांमुळे अनुक्रमे श्रीपाद श्रीवल्लभस्वामी व श्रीनृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांचे चरित्रकार्य समाजमनामध्ये रुजू झाले. ज्याप्रमाणे श्रीस्वामीसमर्थांचे ‘श्रीगुरुलीलामृत’, श्रीगजानन महाराजांचे ‘श्रीगजानन विजय’, श्रीसाईनाथांचे ‘श्रीसाईसच्चरित्र’, श्रीमाधवनाथांचे ‘दीपसंजीवनी’ त्याचप्रमाणे श्रीशंकर महाराजांचे ‘श्रीशंकरगीता’ हे चरित्र जनमानसांत दृढ आणि प्रचलित आहे. ‘श्रीशंकरगीता’ या ग्रंथाच्या लेखनकार्यास प्रारंभ करण्याआधी सदर ग्रंथाचे रचियते पं. भगवंत वासुदेव अघोर तथा अघोरशास्त्री यांना जे अद्भुत व अलौकिक अनुभव आले त्याचे वर्णन करतांना शास्त्री म्हणतात, ‘परमसद्गुरूंच्या दिव्यचरणांकडे पाहून मी त्यांस साष्टांग वंदन केले तेव्हा श्रीमहाराजांनी आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेल्या हाताच्या तळव्यांमध्ये मला शिवपार्वतीचे दर्शन घडले. त्यानंतर लगोलग कोटय़वधी सूर्यांचे तेज एकत्र मिळून यावे अशा रीतीने प्रकटलेल्या श्रीस्वामीसमर्थांच्या दिव्य तेजस्वी रूपाचेही दर्शन घडले. श्रीस्वामीसमर्थांनी स्मितहास्य करून त्यांचे दोन्ही लांबसडक हात फैलावले, दोन्ही पाय वर उचलून छातीपाशी नेले आणि गुडघे छातीशी नेत दोन्ही हातांनी चरणांस कवटाळले. श्रीस्वामीमहाराज अशा रीतीने का बसले असावेत अशी शंका माझ्या मनात येते तोवर त्यांच्या जागी मला श्रीशंकर महाराजांचे दर्शन घडले. सद्गुरूंच्या दिव्य दर्शनाची ही दृष्टांतमालिका श्रीदत्तात्रेय व अष्टावक्र यांच्या दर्शनासह खंडित झाली.

या दृष्टांतमालिकेचा अर्थ लक्षात घेत, अघोरशास्त्री ‘श्रीशंकरगीता’ या ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये पुढे म्हणतात, ‘कलियुगात अवतरित झालेल्या श्रीशंकर महाराजांचे हे ‘अष्टावक्र’ रूप आहे. अष्टावक्र थोर अधिकारी सत्पुरुष होते. जन्मांस येतेवेळी मातेच्या गर्भात असताना अष्टवक्रांनी चारही वेद मुखोद्गत केले होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी जनक नृपतींशी युद्ध करून त्यांच्या बंदीखान्यातील ऋषिमुनींना मुक्त केले होते असा पुराणांत उल्लेख आहे. अष्टवक्रांच्या शरीरास आठ ठिकाणी वक्रता म्हणजेच वाकडेपणा असल्याने त्यांना ‘अष्टावक्र’ असे संबोधण्यात येते. श्रीशंकर महाराजांच्या देहासही ‘अष्ट’वक्रता असल्याने त्यांचा उल्लेखदेखील ‘अष्टावक्र’ असाच केला जातो.

एका गुरुवारी, पहाटे झोप चाळविल्यामुळे जागे झालेल्या अघोरशास्त्री यांना थेट दृष्टांत घडला. अवचित जाग आली म्हणून पांघरूण घेऊन अघोरशास्त्री नुसतेच पडून राहिले असता समोरच्या बाजूस पडद्यावर ओवीसदृश्य ‘अक्षरे’ चक्रासमान गरागरा फिरू लागली. पुढे एकामागोमाग एक असे चारही चरण अघोरशास्त्री यांना स्पष्टपणे दिसू लागले आणि त्यातूनच ‘शंकर महाराजांचे चरित्र। रसाळ गोड पवित्र। ज्याला वाटे आपण पात्र। तोच सत्पात्र होतसे।।’ ही ओवी त्यांना स्पष्टपणे दिसली. अघोरशास्त्री यांनी ती ओवी लक्षपूर्वक वाचली आणि स्मरणपूर्वक लिहून काढली. ही ओवी ‘श्रीशंकरगीता’ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील 43व्या क्रमांकावर आहे.

‘श्रीशंकर महाराजांचे हे रसाळ, मधुर असे पावन चरित्र वाचण्यास आपण योग्य आहोत असे ज्याला वाटेल तोच ‘सुयोग्य’ आहे असे जाणावे’ हे सुचविणारी ओवी श्रीशंकर महाराजांच्या भक्तांसाठी ‘वरदान’ स्वरूप आहे कारण जे ‘श्रीमहाराजांचे कृपाप्राप्त’ आहेत त्यांना या मधुर चरित्राचा लाभ होईल. ‘श्रीशंकरगीता’ या चरित्रग्रंथाचे नायक अर्थात श्रीशंकर महाराज यांच्या संदर्भातील प्रत्येक कृती त्यांच्यामधील अवधूततत्त्व दर्शविणारी आहे. श्रीमहाराजांचे अवतारकार्य अलौकिक व अवर्णनीय घटनांनी व्यापलेले आहे. सर्वसामान्यांच्या बुद्धीपलीकडे जाणाऱया, मानवी बुद्धीच्या मर्यादा आणि चिकित्सकांची आकलनक्षमता यांच्या कवेत न येणाऱया अशा या घटना आहेत म्हणूनच श्रीशंकर महाराजांसारख्या थोर सिद्धसत्पुरुषांना जाणून घ्यायचे असेल तर वाचकभक्तांकडे श्रद्धेशिवाय अन्य पर्याय व तरणोपायदेखील नाही.

आपली प्रतिक्रिया द्या