
महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया पाटण तालुक्यातील येराड येथील श्री येडोबा देवाच्या वार्षिक यात्रेस सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱया यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी छोटा छबिना मोठय़ा उत्साहात झाला. या छबिन्यात मानाच्या सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या. ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात पहाटे श्री जोगेश्वरी देवी व येडोबा देवाचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
दरम्यान, सोमवारी (दि. 18) मोठा छबिना असल्याने व कोरोनाच्या दोन वर्षांनंतर ही यात्रा होत असल्याने यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र येराड येथे दाखल झाले आहेत. श्री क्षेत्र येराड येथून देवाचे मानकरी नेरळे गावी या विवाह सोहळ्यातील श्री येडोबा देवाची कुरवली असलेल्या श्री जानुबाई देवीला आणण्यासाठी मुराळी म्हणून गेले. रात्री वाजतगाजत जानुबाई देवीला घेऊन आले. आज पहाटे कोयना नदीकाठावर असलेल्या श्री क्षेत्र येराड येथे विवाह सोहळा पार पडला. सकाळी 10 वाजता मानकऱयांसह भाविकांच्या नैवेद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी छोटय़ा छबिन्यास सुरुवात झाली.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यातील सासनकाठय़ांसह कर्नाटक राज्यातील सासनकाठय़ा, श्री येडोबा व श्री जोगेश्वरी देवी यांच्या पालख्या मंदिर प्रदक्षिणेस निघाल्या की छबिन्यास सुरुवात होते. छबिन्यात मांजरी, देवराष्ट्रे, नगर, मंगळवेढा, काटेगाव, मसूर, पेठनेर्ले, कांबिरवाडी, किंग, नांदलापूर, कोळेवाडी, दगडवाडी, काळमवाडी, शेनवडी, मायणी, तासवडे, मानेवाडी (खटाव), येवलेवाडी (वडेगाव) आणि नेरळे, सुरुल, धावडे, झावडे व नाटोशी या मानाच्या सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात छबिना मंदिर प्रदक्षिणा घालत असताना ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करीत भाविकांनी गुलाल-खोबऱयाची उधळण केली. मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून छबिना पूर्वेकडील श्री नाईकबा मंदिरात नाईकबा देवाच्या भेटीला गेला. भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर छबिना विसर्जित झाला.





























































