
श्रीनगर पोलिसांच्या एका पथकाने लश्कर ए तोयबा आणि टीआरएफ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांना श्रीनगरच्या नाटिपोरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे.
तिघांबद्दल गुप्तचरांमार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक छोटी तुकडी हरनबल नाटिपोर येथे तैनात केली होती. एका चेक पॉइंटवर पोलिसांनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या तिघा हस्तकांना ताब्यात घेण्यात आले. इम्रान अहमद नजर, वसीम अहमद मुट्टा आणि वकील अहमद भट्ट अशी या तिघांची नावे आहेत.
कारवाईत 3 हॅण्डग्रेनेड, पिस्तूलचे 10 राऊंड, एके 47 चे 25 राऊंड तसेच इतर स्फोटके हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित दहशतवादी श्रीनगर शहरात घातपात घडवून आणण्यासाठी लश्कर ए तोयबा आणि टीआरएफच्या दहशतवाद्यांकडून स्फोटके घेत होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, तीन जवान जखमी
कुलगाम जिह्यातील हालन जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये शुक्रवारी चकमक उडाली. जम्मू-कश्मीर पोलीस आणि सैन्यदलाने हालनच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे. यादरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेल्या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन जवान जखमी झाले.


























































