एक तरफ मोहम्मद, दुसरी तरफ कृष्णा! शुभमन गिलच्या या वाक्याने सोशल मीडियावर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लीड्स कसोटी सामन्यात ( हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी) इंग्लंडने हिंदुस्थानचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात हिंदुस्थानी संघाने एकत्रितपणे 5 शतके झळकावली होती. तरीही हिंदुस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. बेन डकेटने 149 धावांची खेळी खेळून इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

या सामन्यात हिंदुस्थानी गोलंदाजांची कामगिरी अतिशय खराब झालेली पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. यामुळे हिंदुस्थानचा पराभव झाला. दुसरीकडे हिंदुस्थानी गोलंदाजही अपयशी ठरले होते. असे असले तरीही कॅप्टन शुभमन गिल याने गोलंदाजांना सांभाळण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला होता.

बेन डकेट आणि जॅक क्रॉलीच्या विक्रमी भागीदारीदरम्यान, शुभमनने स्लिप कॉर्डनमधून केलेले एक विधान आता चांगलेच चर्चेमध्ये आहे. हे विधान स्टंप माइकच्या माध्यमातून आता, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी शुभमन खेळाडूंना सांगतोय की, ”एक तरफ मोहम्मद, दूसरी तरफ कृष्णा दोनों तबाही मचाएंगे” हे विधान माइकवर रेकॉर्ड झाले.

गिलने केलेले हे विधान, प्रामुख्याने सिराज आणि कृष्णाचे मनोबल वाढवण्यासाठी होते. गिलच्या या मजेदार आणि उत्स्फुर्त अशा वक्तव्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

शुभमनच्या या विधानामुळे अनेकांना विराट कोहली आणि रोहित शर्माची आठवण आली. विराट आणि रोहित कायमच स्टम्प माइकवर अनेक मजेदार विधाने करत असत. आता ऋषभ पंत आणि शुभमन गिल देखील यामध्ये सामील झाले आहेत. शुभमन गिलने कृष्णा आणि मोहम्मद सिराजची नावे ज्याप्रकारे देवांशी जोडली, ते इंटरनेटवर सर्वांना खूप आवडले आहे. त्यामुळेच या वाक्यावर अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत.