
हिंदुस्थानची डबल ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने आज बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या पाचव्या मानांकित बिंग जियाओवर 21-9, 13-21, 21-19 अशी मात करीत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयामुळे सिंधूचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. याआधीही सिंधूने 2014 च्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. कोविड -19 च्या महामारीमुळे आता दोन वर्षांनंतर ही स्पर्धा खेळवली जात आहे.
आजच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या जियाओचे पारडे भारी होते. कारण आतापर्यंतच्या लढतींत तिने नऊ वेळा सिंधूला पराभूत केले होते, तर सिंधूला तिला सात वेळा पराभूत करत आले होते. मात्र 1 तास 16 मिनिटांच्या प्रदीर्घ झुंजीत सिंधूने आपला संयम आणि जिगर कायम राखत बलाढय़ चिनी बॅडमिंटनपटूला अखेर पराभूत केले.
सात्त्विक-चिराग जोडीही पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्य फेरीत अकीरा कोगा आणि ताइची साइतो या जपानच्या जोडीला 21-17,21-15 असे सहज पराभूत करीत हिंदुस्थानच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तिसऱया मानांकित जोडीने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. त्यांचा मुकाबला आता मलेशियाच्या पाचव्या मानांकित आरोन चियन आणि सोह वूई यिक यांच्याशी होणार आहे. सिंधूपाठोपाठ हिंदुस्थानचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यालाही पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे.



























































