काँग्रेस विरुद्ध काँग्रेस घमासान सुरूच! पत्र लिहिणाऱ्या नेत्यांची झाली बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anand-sharma-new

काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आहे. त्यानंतरही नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून पक्षात ‘काँग्रेस विरुद्ध काँग्रेस’ असे घमासान सुरूच असून यासंदर्भातील पत्र सार्वजनिक करण्याची मागणी संबंधितांकडून केली जात आहे. त्यातच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘पद नाही, तर देश महत्त्वाचा’ असे सूचक ट्विट केले आहे.

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशपातळीवर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावा व गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी करण्यात आली. यावरून काँग्रेसमध्ये एकच वादळ उठले आहे. यासंदर्भात काँग्रेस कार्य समितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. या बैठकीमधील सर्व ठरावांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जितेंद्र प्रसाद, मुकुल वासनिक यांनी पाठिंबा दिला. या बैठकीनंतर नेतृत्वबदलासंदर्भातील पत्रावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या काँग्रेसच्या 9 वरिष्ठ नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या घरी रात्री बैठक झाली. कार्य समितीचे सदस्य नसणारे काही नेते बैठकीमध्ये काय झाले हे जाणून घेण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती, असे शर्मा यांनी सांगितले.

आझाद यांच्या घरी झालेल्या बैठकीस काँग्रेस नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते. या बैठकीनंतर आज पुन्हा कपिल सिब्बल यांनी एक ट्विट केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये महाभारत सुरूच असल्याचे दिसत आहे. ‘ही कोणाच्याही पदाची गोष्ट नाही. ही माझ्या देशाची बाब आहे. जी सर्वाधिक गरजेची आहे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. सिब्बल यांनी आज वापरलेली भाषा अतिशय सौम्य पण सूचक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पत्र जनतेच्या समोर आलं पाहिजे!

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये सर्वांना बोलण्याची संधी मिळाली आणि स्पष्टपणे चर्चा झाली, मात्र या 23 नेत्यांनी पाठकलेले पत्र बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या सदस्यांना दाखवण्यात आलेले नाही. या पत्रासंदर्भात अनेक गैरसमज होते, अनेक शब्द चुकीच्या अर्थाने घेण्यात आले ज्यामुळे आमच्याविरोधात काही वक्तव्य करण्यात आली. हे पत्र जनतेच्या समोरही आले पाहिजे ज्यामुळे नक्की कशामुळे ही चर्चा होत आहे हे त्यांनाही कळू शकले, असे आनंद शर्मा म्हणाले.