
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या काठ्या आणि झेंड्यांची मिरवणूक काढण्यात आली. गोजमगुंडे परिवाराच्या मानाची काठीची आणि झेंड्याची गौरीशंकर मंदिरापासून निघालेली मिरवणूक आकर्षक ठरली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत गावभागातील नागरिकांनी काठी आणि झेंड्याचे ठिकठिकाणी पूजन केले.
मानाच्या काठीची मिरवणूक हे यात्रेचे वैशिष्ट्य आहे. परंपरेनुसार गोजमगुंडे परिवाराच्या मानाच्या काठीचे निवासस्थानी पूजन करण्यात आले. सोलापूर देवस्थानची ही मानाची काठी आहे. त्यानंतर ही काठी गौरीशंकर मंदिरात आणण्यात आली. तेथे प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त यु एस पाटील, विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झेंडा आणि काठीची पुजा करण्यात आली.

























































