स्थानिक प्रशासनाकडून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींनाच परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, स्थानिक प्रशासनाने गतवर्षीच्या पार्श्वभूमीवर यंदाही धार्मिक विधींनाच परवानगी दिली आहे. मात्र, यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘अक्षता सोहळ्या’चा निर्णय विभागीय स्तरावर होणार आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. आता विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे भाविकांचे लागले आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेशवरांची महायात्रा प्रतिवर्षी जानेवारीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक विधींना प्राधान्य देत गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले असून, यात्रेबाबत देवस्थान पंच कमिटीने पालिकेकडे परवानगी मागितली होती. याबाबत जिह्याधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाची बैठक झाली. यात दोन्ही विभागांकडून आलेल्या उपाययोजनांसह अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

स्थानिक प्रशासनाने यापूर्वीच धार्मिक विधींना परवानगी दिली आहे; परंतु मुख्य सोहळा असलेल्या ‘अक्षता सोहळ्या’बाबत सोलापूरकरांत संभ्रमाची अवस्था आहे. या अक्षता सोहळ्यास राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात. होम मैदानावरील गड्डा यात्राही महिनाभर मोठय़ा प्रमाणावर असते. तेथील गर्दी लक्षात घेऊन त्याविषयी सूचना मागविण्यात आल्या होत्या. कमी भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पाडण्याकडे प्रशासनाचा कल असून, परजिह्यांतून येणाऱया भक्तांबाबतही प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही धार्मिक विधी वगळता, गर्दी टाळण्यासाठी गतवर्षीसारख्याच नियोजनाची तयारी प्रशासनाने केली आहे.

दरम्यान, या यात्रेसंबंधी शहर व जिह्यात तर्क-वितर्क व संभ्रमाची माहिती प्रसारित होत असल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मानकरी व पुजाऱयांनी केली आहे.

कासेगाव येथील यल्लमा देवीची यात्रा रद्द

राज्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीची 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना व ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, यात्रेसाठी बाहेरील भाविकांनी कासेगाव येथे येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. यात्राकाळात देवीचे धार्मिक विधी विधिवत करण्यात येणार आहेत. तसेच दर्शनासाठी येणाऱया 100 मानाच्या जोगतिणींना प्रवेश देण्यात येणार असून, सोबत लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.