सिद्धेश्वर यात्रा रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविलेला नाही, मनपा आयुक्तांची माहिती

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांची यात्रा रद्द करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला नसल्याची माहिती सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ‘सिद्धेश्वर यात्रा रद्द करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा प्रशासनाने कोणाशीही केलेली नाही. याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाकडेही पाठविलेला नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेतले जात आहेत. मात्र, सिद्धेश्वर यात्रेसंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा आपल्या पातळीवर चर्चा झालेली नाही.

कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. बंद करण्यात आलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. कोरोना रुग्णांचे अलगीकरण आणि विलगीकरण करण्याची पुरेशी व्यवस्था केली जाईल. शिक्षकांमार्फत पुन्हा घरोघरीचा सर्व्हे सुरू करीत आहोत. खासगी रुग्णालयांनादेखील आवश्यक सूचना दिल्या आहेत. परिस्थितीचा सामना करण्यास महापालिका प्रशासन खंबीर आहे, असेही महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

सोलापूरचा मृत्यूदर साडेतीन टक्क्यांवर

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात घट झाली आहे. जून महिन्यात 165, जुलै महिन्यात 113, ऑगस्टमध्ये 45, सप्टेंबर महिन्यात 60, ऑक्टोबरमध्ये 55 आणि चालू महिन्यात 20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर साडेतीन टक्क्यांवर आला आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून येताच चाचणी करून घेतली आणि लवकर उपचार घेतला, तर मृत्यूदरात आणखी घट होईल, असेही पी. शिवशंकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या