शिवशाही बसमध्ये सापडली 41 लाख रुपयांची चांदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे- नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या शिवशाही बसमधून चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी चांदीचा माल शनिवारी जप्त केला होता. त्याची किंमत 41 लाखांची असल्याचं निष्पन्न झालं आहे.

शनिवारी रात्री उशिरा फ्रेजरपुरा पोलिसांनी या मालाची मोजणी केली असता हा माल 60 किलो भरला असून, त्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. एकूण 41 लाख 59 हजार रूपयांचा मुद्देमाल सध्या फ्रेजरपुरा पोलिसांच्या कस्टडीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुरिअर व्यावसायिक व सुवर्णकार अशा दोघांचे बयाण नोंदविले आहे.

पुणे- नागपूर शिवशाही बसमधून पुण्यावरून लगेज टाकण्यात आले. त्यासोबत असणारा प्रवासी उतरत होता. मात्र लगेज काढता न आल्याने चालक वाहकाला संशय आला होता. त्याने तपासणी केली असता त्यात चांदी आढळून आल्याने चालकाने बस थेट पोलीस आयुक्तालयात नेली होती.

याप्रकरणी बसमधून चांदीची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांना आला होता. मात्र सदर माल हा कुरिअरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरिअर व्यावसायिक व सुवर्णकाराचे जबाब नोंदविण्यात आले. माल सोडविण्यासाठी सदर व्यावसायिक न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.