
इव्हेंट आणि मनोरंजन कंपन्यांकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यटनवृद्धीसाठी या कार्यक्रमांसाठीची परवाना प्रक्रिया अधिक सुलभ करावी अशी मागणी इव्हेंट ऍण्ड मॅनेजमेंट असोसिएशनकडून करण्यात आली. ही परवाना प्रक्रिया सुलभ करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असून येत्या 60 दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
इव्हेंट ऍण्ड मॅनेजमेंट असोसिएशनसोबत (ईईएमए) पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत कार्यक्रमांसाठी असलेल्या तिकिटांवर लावण्यात येणारा 28 टक्के कर 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचा जीएसटी कमी करण्यात यावा, लाऊडस्पीकर परवानगीच्या वेळेत वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे हॉटेल्स, सभागृह, मैदाने, लग्न सोहळ्याचे हॉल यासाठी लागणाऱया परवानग्या शिथिल करण्यात याव्यात आदी मागण्या ‘ईईएमए’कडून करण्यात आल्या. यावेळी परवान्यांबाबत 60 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनासंदर्भातील जे विषय असतील ते मार्चअखेरपर्यंत सोडवले जातील असे सांगितले. यावेळी ईईएमएचे सब्बास जोसेफ, दीपक पवरा, रिमा संघवी तसेच पर्यटन आणि उत्पादन शुल्क सचिव वल्सा नायर आदी उपस्थित होते.































































