
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
पैशाच्या आमिषाला बळी पडून सिंधी समाजातील काहीजण ख्रिस्ती धर्मात प्रवेश करत आहेत. इतकेच नाही तर मंदिरांमध्ये मेणबत्त्या पेटवून ख्रिस्ती धर्माचा प्रचारही करत आहेत. त्याविरोधात हजारो जागरूक नागरिकांनी एकवटत मंगळवारी उल्हासनगरातील झुलेलाल व चालिया मंदिरात तब्बल 3 लाख 19 हजार 450 तुपाचे दिवे उजळवले. त्यामुळे परिसरात तुपाचा अक्षरशः घमघमाट पसरला असून धर्मांतर करणाऱ्यांना अशाप्रकारे इशाराच दिला आहे.
ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्याचे लोण उल्हासनगरात फोफावले आहे. सुमारे एक हजाराच्या वर सिंधी परिवाराने ख्रिश्चन धर्मात प्रकेश केला आहे. वास्तविक ही संख्या पन्नास ते साठ हजारांच्या घरात आहे. ख्रिस्तीचे प्रतीक हे मेणबत्ती आहे. सिंधी समाजाच्या मंदिरात, दरबारात दिवा पेटवला जातो. मात्र धर्मांतर करणारे सिंधी नागरिक हे दिव्याऐवजी मेणबत्तीचा वापर करून धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याचे प्रमाण वाढले होते. हा प्रकार रोखण्यासाठी सिंधी जागरूक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात संत भाऊ लिलाराम, सभागृहनेते जमनादास पुरस्कानी, नगरसेवक मनोज लासी, माजी नगरसेवक होशियारसिंग लबाना, सोनू विषणानी, शंकर नागरानी, कपिल ताराचंदानी, प्रकाश तलरेजा आदींचा समावेश आहे.
उपवासाच्या महापर्वातून दिला संदेश
16 जुलैपासून कॅम्प नंबर 1 मधील भाऊ परसराम झुलेलाल मंदिर येथे व 8 ऑगस्टपासून कॅम्प नंबर 5 मधील चालिया मंदिरात 40 दिवसांच्या उपवासाचे महापर्व सुरू होते. या उपवासाच्या महापर्वाची सांगता काल मंगळवारी झाली. त्यातूनच धर्मांतर रोखण्याचा संदेश देण्यात आला. यासाठी या दोन्ही मंदिरात मेणबत्तीला हद्दपार करून सिंधी समाजाने 3 लाख 19 हजार 450 तुपाचे दिवे उजळवले आहेत.





























































