
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. कणकवलीतील विजयदुर्ग-तळेरे रस्त्यावर शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुप्रिया सुनील जावकर असे मयत महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जावकर, फणसेकर, मणचेकर कुटुंबीय कारमधून देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून घरी परतत असताना विजयदुर्ग-तळेरे रस्त्यावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील सर्वजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सुप्रिया सुनील जावकर या महिलेचा उपचारादम्यान मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.
सुनील पांडुरंग जावकर(65), अथर्व महेश जावकर (12), हर्ष संदीप फणसेकर (16), सुनिता सुधीर जावकर (65), दीपा संदीप फणसेकर (19), सवित्री संदीप फणसेकर (53), शैलेंद्र आप्पा मचणेकर (43) हे जखमी झाले. अथर्व जावकर, सुनिता जावकर, दीपा फणसेकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.