सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत सोमवारी नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेती नुकसानीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी करणार आहेत. सिंधुदुर्गातील कणकवली व कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार या नुकसानीचे पंचनामे सध्या जोरात सुरू आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक संयुक्तपणे पंचनामे करीत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत सोमवार 19 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जाऊन पाहणी करणार आहेत.

ते सोमवारी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली जि. सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्यानंतर सकाळी 9.30 वा. खारेपाटण-कासार्डे (ता. कणकवली) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वा. आंब्रड ता. कुडाळ (दिंडाळेवाडी) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून 11.45 वा. वेताळबांबर्डे येथे, दुपारी 12.15 वा. पावशी-शेलटेवाडी, 12.45 वा. पिंगुळी व 1.30 वा. माणगाव येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी 2.30 वा. पाहणी स्थळावरुन मोटारीने सिंधुदुर्गनगरी ओरोसकडे प्रयाण. 3.00 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). दुपारी 4 वा. हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 करीता बदल करण्यात आलेल्या निकाषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत चर्चा  (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). सायं. 4.15 वा. पत्रकार परिषद. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग).  सायं. 5.30 वा. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण असा त्यांचा दौरा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या