राज पथावरील चित्ररथात सिंधुदुर्गची झालर! सिद्धेश मालणकरच्या प्रतीकृती ठरल्या लक्षवेधक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या चित्ररथ प्रदर्शनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वात लोकप्रिय चित्ररथ म्हणून प्रथम क्रमांक मिळाला. जैवविविधता या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आला होता. त्याला सिंधुदुर्गची झालर होती, ती म्हापणच्या सिद्धेश मालवणकर यांच्या मोर आणि वडाच्या झाडाची.

पाट हायस्कूलमधून सिंधु महोत्सवासाठी त्याने चित्ररथ केले होते. त्यामध्ये सिद्धेश यांचा सहभाग होता आणि या ठिकाणाहूनच चित्ररथासाठी सिद्धेशने सुरुवात केली, असे कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी सांगितले. साळसकर आणि सहकारी यांनी मिळून विमानतळाची प्रतिकृती तसेच दुसऱ्या वर्षी किल्ला आणि पर्यटन जिल्हा असे चित्र तयार केले होते. त्यावेळी या चित्ररथानांही प्रथम क्रमांक मिळवला होता. कोळीनृत्यामध्ये सिद्धेश सहभागी झाला होता. सिद्धेशने यापूर्वी अनेक स्टेज शोमध्ये सहभाग घेऊन कौतुकाची थाप मिळविली आहे.

लोखंडी तारा फोम रंगीत कागद इत्यादी साहित्याचा वापर करून विविध प्राणी-पक्षी सिद्धेशने बनविले आहेत. त्यामध्ये कोंबडी नृत्यामुळे सिद्धेश राज्यात प्रसिद्ध झाला होता, त्याचे कॉपीराईट पण त्याच्याकडे असल्याचे तो सांगतो. दिल्ली येथील चित्र रथामध्ये दिसलेले मोर आणि वडाचे झाड लक्ष वेधून घेणारे होते. चित्ररथात बनविलेला मोर आणि वडाचे झाड आहे, ही त्याची विशेष मेहनतीने तयार झालेली निर्मिती आहे. मोराचा बांधा सुडौल भरदार दिसण्याकरिता त्याला गौतम कोचरेकर (कोचरा), गजा कोदे (सावंतवाडी) ,प्रसाद मिसाळ, सिद्धेश चव्हाण (हुमरमळा) ,ओंकार मडवळ (म्हापण), अक्षय म्हाडेश्वर यांचे चांगले सहकार्य लाभले. दिल्ली येथे सर्व नियोजन आणि चित्ररथासाठी अक्षय वास्कर यांनी सहकार्य केले. सिद्धेशचा म्हापण ते दिल्ली राजपथ हा कलाकृतीचा प्रवास थक्क करणारा आहे आणि आज या महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशामध्ये सर्वात लोकप्रिय चित्ररथम्हणून प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.