
मिसेस परफेक्ट मिळविण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अमेरिकेतल्या टेक्सास येथील एका आजोबांनी मनाजोगी वधू मिळवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या ड्रिमगर्लच्या शोधात या आजोबांनी चक्क वधूच्या शोधात असल्याचा टेक्सास हायवेवर भलामोठा बोर्ड लावून जाहिरातच केली आहे. त्यामुळे अमेरीकेतील हे पोस्टर चर्चेचा विषय बनले आहे.
जिम बेज असे या आजोबांचे नाव आहे. जिम बेझ यांचा प्रेमावर विश्वास आहे. इतरांप्रमाणे तेही आपल्या ड्रीमगर्लच्या शोधात आहेत. त्यांचे दोन वेळा लग्न झाले, मात्र दोन्हीवेळा त्यांचा संसार टिकला नाही. त्यांना पाच अपत्ये आहेत. अखेर या आजोबांनी पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी वयाच्या 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जिम बेज यांनी डेटिंग अॅपवरही आपले नशीब आजमावले मात्र तिथेही निराशाच आली. अखेर त्यांनी थेट अमेरीकेतील सगळ्यात जास्त वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक्सास रस्त्यावर होर्डींग लावून, आपण चांगल्या मुलीच्या शोधात असल्याची जाहिरातच केली.
या होर्डींगवर जिम यांनी लिहिलेल्या मजकुरात म्हटलंय की ‘मी एका चांगल्या महिलेच्या शोधात आहे. ती महिला वयाने 50 ते 55 असायला हवी. जी माझ्यासोबत फिरु शकेल, गप्पा मारु शकेल आणि माझ्या चांगल्या कामात साथ देऊ शकेल’ जिम यांनी या होर्डींगवर त्यांचा मोबाईल नंबरही दिला आहे, इच्छुक महिलांना व्हॉईसमेलद्वारे आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केले आहे.
अॅस्टोनिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जिम बेज सांगतात की, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा साथीदार मिळणे सोपे असते, मात्र या वयात साथीदार मिळणे फार कठीण आहे. आपल्याला आतापर्यंत बरेच व्हॉईसमेल आले आहेत, मात्र अद्यापही योग्य साथीदार मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.




























































