Lok Sabha Election 2024: उपवरांची लग्ने लावून देणार! वंचितच्या उमेदवाराचं अजब आश्वासन

लोकसभा निवडणुकीचे पडघम जोमाने वाजू लागताच अनेकांना आपणच खासदार होणार अशी स्वप्ने पडू लागलीत. त्यासाठी भावी खासदार मंडळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ना ना युक्त्या लढविताना दिसतात. विदर्भातील एका महिला उमेदवाराने मतदारांनी आपल्याला निवडून दिले तर अल्पदरात दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचा किस्सा गाजत असताना माढा लोकसभा मतदासंघातील वंचित आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी लग्नाच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांची (उपवरांची) लग्ने लावून देवू असे अजब आश्वासन दिले आहे. मात्र त्यासाठी मुली कशा उपलब्ध करणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

मतदारांपुढे महागाई, बेरोजगारी, शेती, भ्रष्टाचार आदी मुद्दे आवासून उभे असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या सर्व प्रश्नांना पेक्षा वेगळा प्रश्न अविवाहित तरुणांची लग्न करणं हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने गुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या उपवरांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात वंचितने रमेश बारसकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. उमेदवारी जाहीर होताच ते पंढरपूर मधील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी ही अफलातून घोषणा केली आहे.

बारसकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची वेळेवर लग्नं होत नाही. त्यामुळे समाजात मोठी समस्या निर्माण झाली आहे. 35 – 40 वर्षे उलटून गेली तरी अनेक तरूणांची लग्नं होतं नाहीत. लग्न होत नसल्याने तरूणांमध्ये नैराश्य आले आहे. इतर सामाजिक प्रश्नांपैकी हा देखील ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.

अविवाहित तरूणांच्या लग्नांची वाढती समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाढत्या बेरोजगारीमुळे अविवाहित तरूणांची संख्या वाढली आहे. माढ्यात वंचित बहुजन आघाडी विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास ही बारसकर यांनी व्यक्त केला.