शीव उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार, दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दोन महिने या पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने या कामामुळे शीवमध्ये ट्रफिक जॅम होणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत आठवडय़ाला चार दिवस हे काम केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हे काम केले जाणार आहे. 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिलपर्यंत हे काम चालणार आहे. यादरम्यानच्या प्रत्येक आठवडय़ात गुरुवार पहाटे 5 ते सोमवार पहाटे 5 वाजेपर्यंत हे बेअरिंग बदलण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी एकूण आठ ट्रफिक ब्लॉक वाहतूक विभागाने मंजूर केले आहेत. त्यातील पहिला ब्लॉक उद्या पहाटे 5 ते 17 फेब्रुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असणार आहे.

पूर्व उपनगरांमध्ये जाणारी आणि तेथून येणारी बहुतांश वाहने शीव उड्डाणपुलावरून जातात. शीव उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने शीव सर्कल येथे मोठय़ा प्रमाणावर ट्रफिक जॅम होणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागातील वाहतूक पोलिसांची संख्या वाढवली जाणार आहे.

आयआयटी मुंबईतील तज्ञांनी दिला होता सल्ला
शीव उड्डाणपुलाची तपासणी पवई येथील आयआयटी मुंबईतील तज्ञांच्या टीमने केली होती. या पुलाचे 170 बेअरिंग बदलण्याचा सल्ला तज्ञांनी दिला होता. त्यांच्या सूचनेवरूनच गेल्या डिसेंबरपासून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.