डोक्याला ‘पूल’ टू ताप, शीवचा फ्लायओव्हर बंद होणार

सामना ऑनलाईल । मुंबई

मुंबईकरांना आता ‘ससा आणि कासवा’च्या शर्यतीची गोष्ट सांगण्याच्या फंदात कुणी पडू नये. कारण जागोजागी खोदलेले रस्ते, तशात लोअर परळ पूल बंद झाल्याने वाकडी झालेली वाट आणि आता गाडीच्या टायरखाली घोंघावणारे शीव फ्लायओव्हर बंद होण्याचे संकट, यामुळे मुंबईकरांचा अगोदरच कासव झालाय, मग ते शर्यत जिंकणार तरी कसे? उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या डोक्याला हा असा ‘पूल’ टू ताप झाला आहे!

मुंबईत पूर्वी टेलिफोनवाले गल्लीबोळातील रस्ते खोदायचे. मग ट्रफिकचा बट्ट्याबोळ व्हायचा. टेलिफोनवाले बंद झाले, आता मेट्रो-मोनोवाले अवतरले. नव्या प्रवासी सुविधेसाठी नाहीतर पाण्याच्या-ड्रेनेजच्या पाइपलाइनसाठी खुदाई सुरूच आहे. लालबागचा मुख्य रस्ता त्याच कारणासाठी बंद ठेवल्याने सर्व वाहतूक केईएममार्गे वळविण्यात आली. परिणामी ट्रफिक जॅम.

लोअर परळ हे मुख्य बीज
मुंबईतील ट्रफिक जॅमचे मुख्य बीज बंद केलेल्या लोअर परळ पुलाने रोवले आहे. हा पूल बंद झाल्याने प्रभादेवी, महालक्ष्मी आणि दादर टिळक ब्रिजवर प्रचंड ताण आला आहे. मध्य मुंबईतच असा वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने जो-तो हैराण आहे. आता तर शीव उड्डाणपूल 20 एप्रिलपासून दुरुस्तीसाठी बंद करण्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईभर वाहतूककोंडी होणार हे उघड आहे. घामेजलेल्या मुंबईकरांचा आणखी घामटा काढणारा हा निर्णय आहे. मुंबईकरांसमोर पदयात्रा करण्याशिवाय पर्याय नाही, अशी खोचक प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.