शीव-पनवेल महामार्गाची कोंडी दूर होणार, चार पदरी पूल आठ पदरी करण्याची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्द आणि गोवंडी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील जुईनगर ते तुर्भे उड्डाण पुलाचीही रुंदी वाढविण्याचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) हाती घेतले आहे. या कामामुळे मानखुर्दचा चार पदरी पूल आठ पदरी होणार असल्याने शीव ते पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी त्यामुळे दूर होणार आहे. या दोन्ही पुलाच्या रुंदीकरणासाठी जवळपास 94 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलांच्या उभारणीचे तसेच दुरुस्तीचे काम एमआरआयडीसीने हाती घेतले आहे. यात शीव-पनवेल महामार्गावरील मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गाच्या मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यानच्या उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाच्या शेजारी नवे पिलर उभारून त्यावर गर्डरचे बांधकाम करून या जुन्या उड्डाण पुलाची रुंदी दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येणार आहे.

मानखुर्दचा उड्डाण पूल असा रुंद होणार

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गोवंडी आणि मानखुर्द स्थानकांदरम्यानच्या उड्डाण पुलाचे रुंदीकरण करताना जुन्या पुलाच्या शेजारीच 411 मीटरचा नवा भाग चेंबूरपासून वाशीपर्यंत बांधण्यात येणार आहे. तसेच दुसरा 381 मीटरचा भाग वाशी ते चेंबूर असा उलट दिशेने बांधण्यात येणार आहे. यामुळे चार पदरी असलेला हा पूल एकूण जोडल्यास आठ पदरी होणार आहे. या कामासाठी 30.44 कोटींचा खर्च येणार आहे.

तुर्भेच्या उड्डाण पुलाचे रुंदीकरण

ट्रान्सहार्बर मार्गावरील जुईनगर आणि तुर्भे स्थानकांदरम्यानच्या उड्डाण पुलाचे रुंदीकरण करताना रेल्वे मार्गावर एकूण 3 गर्डर टाकण्यात येणार आहेत. पहिला 684 मीटरचा भाग पनवेलपासून चढत्या क्रमाने बांधण्यात येणार असून त्याला वाशीच्या दिशेने उतार देण्यात येणार आहे. दुसरा पुलाचा भाग 607 मीटरचा असणार असून तो वाशीपासून चढत्या क्रमाने असणार असून पनवेलच्या दिशेने त्याचा उतार असणार आहे. या तुर्भे पुलाच्या रुंदीकरणासाठी एकूण 63.84 कोटी रुपये खर्च येणार आहे.