
वाढत्या ताणाबद्दल कर्मचाऱयांच्या वाढत्या तक्रारीनंतर अखेर निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि एकाकेंद्रशासित प्रदेशातील ‘एसआयआर’ मोहिमेला आज मुदतवाढ दिली आहे. संबंधित राज्यांमधील मुख्य निवडणूक आयुक्तांनी विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबार येथे एसआयआरला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मृत मतदारांची यादी मिळणार
सध्या सुरू असलेल्या एसआयआर अंतर्गत राजकीय पक्षांना प्रारूप मतदार यादी जारी होण्यापूर्वी मृत, स्थानांतरीत आणि अनुपस्थित मतदारांची यादी देण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून पक्षांच्या बीएलओंना ती देण्यात येईल. आयोगाचे बीएलओ तीन वेळा प्रयत्न करूनही ज्या मतदारांचा संपर्क झाला नाही, अशा मतदारांचादेखील त्यात समावेश करण्यात येणार आहे.
अमित शहा हे दुर्योधन-दुशासनासारखे – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या एका डोळ्यात दुर्योधन तर दुसऱया डोळ्यात दुशासन दिसेल. ते एसआयआरच्या नावाखाली माता-भगिनींचे अधिकार हिरावून घेतील. तुमचे नाव मतदार यादीतून हटविल्यास तुमच्या स्वयंपाकघरातील भांडी हातात घ्या आणि लढा, असे ममता बॅनर्जी कृष्णा नगरमध्ये एका सभेत म्हणाल्या.
याचिकांवरून सरन्यायाधीशांची नाराजी
सातत्याने दाखल होत असलेल्या याचिकांबाबत सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सगळे केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येत आहे. अशा याचिका स्वीकारणे बंद करा. फक्त एसआयआरवरच लक्ष केंद्रीत करुन चालणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या खटल्यांवरही लक्ष द्यावे लागणार आहे. सर्व खटल्यांना समान वेळ मिळायला हवा. त्यासाठी बार काऊंसिल सदस्यांना वेळा ठरवून द्याव्या लागतील, असे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले.



























































