पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास दुसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school32

सामना प्रतिनिधी । मुंबई

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी राबविण्यात येणारे आरटीईअंतर्गतचे 25 टक्के कोटा प्रवेश अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेनुसार करण्यात यावेत, अशी मागणी सिस्कॉम संघटनेने केली आहे. अकरावी प्रवेशात पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशफेरीत प्रवेशाची पुन्हा संधी मिळते. 25 टक्के कोटा प्रवेशातही हा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

आरटीई प्रवेशात विद्यार्थ्याने ऑनलाइन अर्जात भरलेल्या एकूण पर्यायांमधून मिळालेला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद होतो. त्याला पुन्हा प्रवेशाची संधी मिळत नाही. तसेच शाळेचे पर्याय निवडताना गुगल मॅपवर दिसणाऱया घराजवळच्या खुणेवर क्लिक केल्यास अर्जात नोंदविलेला पत्ता आणि गुगलवरील पत्ता यात तफावत आढळते. त्यामुळे पालकांना ऑनलाइन अर्ज करताना बराच त्रास सहन करावा लागतो, असे सिस्कॉमच्या संचालिका वैशाली बाफना यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्जात नोंदविल्याप्रमाणे पहिल्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला असेल तर त्याला त्या शाळेत प्रवेश घेणे बंधनकारक असावे. या पर्यायाव्यतिरिक्त इतर शाळेत मिळालेला प्रवेश घेतला नसेल किंवा नाकारला असेल तर अशा विद्यार्थ्यांना 25 टक्के कोटा प्रवेशाच्या दुसऱया लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळायला हवी.

  • आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत या सुधारणा हव्यात
  • अर्जात पालकांचे नाव, पत्ता आणि कामाच्या ठिकाणाची नोंद असावी.
  • अर्ज पूर्ण भरल्याशिवाय सबमिट होणार नाही, अशी तरतूद असावी.
  • प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रवेशअर्जात दुरुस्तीची सोय.
  • अर्जामध्ये शिक्षण मंडळाचे (एसएससी, सीबीएससी…) पर्याय हवेत.