
राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक करू नका. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज दिले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्ह्यांतील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.
घरोघरी सर्वेक्षण
मुख्य सचिव सीताराम कुंटे यावेळी म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे आधुनिकीकरण करावे.
गृह विलगीकरणाचा आढावा
कंटेनमेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्यविषयक पाठपुरावा करावा.
लसीकरणाला गती
सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून प्रत्येक त्याला गती द्यावी. ज्या जिह्यांचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरिता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
मास्क आवश्यकच
कोरोना प्रतिबंधक नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी मी जबाबदार ही जाणीवजागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विना मास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले. मैदानात उतरून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.





























































