बैठे काम केल्याने होतो स्मरणशक्तीवर परिणाम…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

जास्त वेळ एकाच जागी बसणे तब्येतीसाठी तसे अयोग्यच. यामुळे कंबरदुखीबरोबरच वजन वाढण्याची समस्याही वाढते. पण एका संशोधनात जास्त वेळ बैठे काम केल्याने स्मरणशक्तीवरही परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील हिंदुस्थानी वंशाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे. या प्रयोगात बऱ्याच वर्षांपासून बैठे काम करणाऱ्या मध्यमवयीन नागरिकांवर संशोधन करण्यात आलं. यात प्रामुख्याने दिवसातील किती तास हे नागरिक एकाच जागी बसून काम करतात, किती वेळा उठतात. वेळेप्रमाणे त्यांच्या स्मरणशक्तीत होणारे बदल यांवर अभ्यास करण्यात आला. त्यांचा एमआरआयही काढण्यात आले. स्मरणशक्तीशी निगडीत काही इतर तपासण्याही करण्यात आल्या. त्यात दिवसातील जास्त तास ज्या व्यक्ती बैठे काम करतात त्यांची स्मरणशक्ती दिवसागणिक क्षीण होत असल्याचं समोर आलं.

या संशोधनावरील अहवाल ‘पीएलओएस वन’ या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. मेडियल टॅम्पोरल लॉब म्हणजे एमटीएल हा मेंदूतील एक असा द्रवभाग आहे जिथे सगळ्या स्मृती साठवल्या जातात. पण मर्यादेपेक्षा अधिक वेळ एका जागी बसल्याने एमटीएल पातळ होते. याचा परिणाम साहजिकच स्मरणशक्तीवर होतो, असे संशोधनात आढळले आहे.