पाच जागांसाठी मैदानावर आले सहाशे उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई  महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आजपासून 910 जवान पदांसाठी दहिसरच्या भावदेवी मैदानावर ‘वॉक इन सिलेक्शन’ पद्धतीने भरती सुरू झाली. सकाळी 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी इच्छुक उमेदवार यायला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विशेष मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षित 8 जागांसाठी तब्बल 622 उमेदवारांनी हजेरी लावली. मात्र शारीरिक चाचणी, वजन-उंची आणि कागदपत्रांच्या पडताळणीअंती 283 उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले.

विशेष मागास प्रवर्गामध्ये (विमाप्र) एक जागा माजी सैनिक आणि दोन जागा महिलांसाठी राखीव असल्याने आज पाच जागांसाठी भरती झाली. तब्बल सात वर्षांनी अग्निशमन दलात भरती होत असल्यामुळे भरतीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. या भरतीत लेखी परीक्षा होणार नसल्यामुळे ‘वॉक इन सिलेक्शन’ पद्धतीसाठी धावणे, जम्पिंग शीटमध्ये उडी मारणे, दोरी चढणे – उतरणे, सोबत मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे आणि पूलअप्स काढणे अशा मैदानी चाचण्या आज घेण्यात आल्या. दरम्यान, या भरतीत एक महिला पद आणि दोन माजी सैनिक राखीव पदांची भरती जाहीर वेळापत्रकानुसार होणार आहे.