Video- इमारतीच्या टेरेसवर जीवघेणे स्टंट, 6 विदेशी स्टंटबाजांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत प्रभादेवी स्टेशन परिसरात एका उंच इमारतीच्या टेरेसवर जीवघेणे स्टंट करणाऱ्यांना 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व स्टंटबाज विदेशी नागरिक असून ते 14 माळ्याच्या दोन इमारतींमधील 22 फुटांचे अंतर उडी मारून पार करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या सहा विदेशी तरुणांची चौकशी करून त्यांची तत्काळ मायदेशी रवानगी केली आहे.

प्रभादेवी स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या एसआरएच्या इमारतीच्या टेरेसवर हे सहा विदेशी नागरिक स्टंट करत होते. या स्टंटबाजीबद्दल इमारतीमधील कुणालाच माहिती नव्हती. मात्र सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी इमारतीचा पाणीपुरवठा तपासण्यासाठी टेरेसवर सुरक्षारक्षक गेला असता हा सर्व प्रकार त्याने बघितला. दुपारच्यावेळी हे स्टंटबाज गुपचुप इमारतीच्या टेरेसवर जीवघेणे स्टंट करत असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने इमारतीमधील रहिवाशांना दिली. या प्रकरणी रहिवाशांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. विदेशात हा प्रकार ‘रुफ टॉप जंप’ म्हणून प्रचलित आहे. मात्र हिंदुस्थानात असे स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे. दादर पोलिसांनी त्यांना ताज हॉटेल मधून अटक केली. एका कार्यक्रमासाठी हे सहा पर्यटक मुंबईत आले होते. मात्र या तरूणांना स्टंटबाजी चांगलीच महागात पडली असून, पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर बुधवारी त्यांची मायदेशी रवानगी केली आहे.