
सामना ऑनलाईन, येवला
तालुक्यातील कुसुर येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम स्मशानभूमीच्या जागेवर सुरू करण्यात आले असून त्याच्या पायासाठी खड्डे खोदताना मानवी हाडे सापडल्याने ग्रामस्थांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन मंडळला ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले असून स्मशानभूमीच्या जागेवर बांधकाम करू नये अशी मागणी या निवेदनात केली आहे.
कुसुर येथे 4 ऑक्टोबर रोजी सभागृहाच्या बांधकामासाठी पायाच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी खोदत असताना कामगारांना खड्डय़ामध्ये मानवी सांगाडे, कवटी, हातापायांची हाडे, महिलांच्या बांगडय़ा आढळून आल्या. कामगारांनी ही बाब गावातील सरपंच संजय गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र सरपंचांनी आडमुठेपणाची भूमिका घेत पुन्हा त्याचा जागेवर कामगारांना खोदकाम सुरू करावयास सांगितल्याने कामगारांनी ही बाब ग्रामस्थांच्या कानावर घातली.
सामाजिक सभागृहामध्ये भविष्यात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने ग्रामस्थांनी स्मशानभूमीवरील बांधकामाला विरोध दर्शविला आहे. गावात सर्वधर्मीय समाज गुण्यागोविंदाने राहत असल्याने गावातील सामाजिक भावना दुखवू नये ही समस्त ग्रामस्थांची भावना असून गावातील मंदिरालगत ग्रामपंचायतीच्या जागेवरच सामाजिक सभागृह उभारण्यात यावे अशी मागणीही या लेखी निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, ईवदचे कार्यकारी अभियंता, तालुका पोलीस निरीक्षक आदींना पाठविल्या आहेत. निवेदनावर नाना औताडे, किरण मेंगळ, दत्तू गायकवाड, माजी सरपंच आबा गायकवाड, दत्तू महादू गायकवाड, बापू गायकवाड आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
तक्रार करणाऱया ग्रामस्थांच्या तक्रारीत काहीच तथ्य नाही. सामाजिक सभागृहाची जागा योग्य आहे. आम्ही तेथे गेलो असता आम्हाला काही मानवी हाडे सापडली नाहीत- संजय गायकवाड, सरपंच, कुसुर

































































