
अंधेरी येथील एका खासगी बँकेच्या एटीएनमध्ये स्किमर लावून ग्राहकाचा डेटा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
गोरेगाव येथे राहणारे एक जण हे खासगी सुरक्षा कंपनीत काम करतात. त्याची कंपनी ही एटीएमना सुरक्षा पुरवण्याचे काम करते. गेल्या आठवडय़ात त्यांना अंधेरी येथील एटीएममध्ये स्किमर लावल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने दिली. त्यानंतर ते त्या एटीएममध्ये गेले. त्याने एटीएमची तपासणी केली असता त्यांना स्किमर मशीन बसलेले दिसले. तसेच एटीएम की बोर्डच्या वर कॅमेरा, मेमरी कार्ड असलेली चिप दिसली. त्यानंतर त्याने याची माहिती बँकेच्या अधिकाऱयांना दिली. बँकेच्या अधिकाऱ्याने जाऊन तेथे तपासणी करून स्किमर ताब्यात घेतले. स्किमरच्या सहाय्याने ठग हे ग्राहकाचा डेटा चोरतात. ग्राहकाचा डेटा चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. यापूर्वीदेखील अंधेरी येथील एका बँकेत स्किमर लावून डेटा चोरीचा प्रयत्न झाला होता.
























































