दात घासता घासता महिलेच्या गालातून आरपार गेला ब्रश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूत एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तरुणी दात घासत असताना तिच्यासोबत असे काही घडले की तोंडात असलेला ब्रश गालातून बाहेर आला. तिची ही अवस्था पाहून डॉक्टरही अवाक झाले.

तामिळनाडूतील कांचीपूरम येथील ही घटना असून ही महिला 34 वर्षांची आहे. मिडीया वृत्तानुसार, 4 मार्चला महिला घरातील बाथरुममध्ये दात घासत होती. दरम्यान अचानक बाथरुममध्ये तिचा पाय घसरला आणि ती फरशीवर जोरात आपटली. ती एवढ्या वेगाने आपटली की तिच्या तोंडात असलेला ब्रश गाल फाडून गालाच्या बाहेर आला. ती किंचाळल्यावर घरातील मंडळी गोळा झाली आणि तिला तत्काळ रुग्णालयात घेऊन गेले. तिची अवस्था पाहिल्यावर डॉक्टरही हैराण झाले.

फरशीवर जोरात आपटल्याने तोंडात असलेला ब्रश गालातून बाहेर आला. तो ब्रश महिलेच्या गालात अशा पद्धधतीने फसला होता की ती महिला तोंड उघडूही शकत नव्हती आणि बंदही करु शकत नव्हती. डॉक्टरांनी तिला तपासले असता तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची तिच्या घरच्यांना कल्पना दिली. महिलेला भूलीचे इंजेक्शन देऊन गालात अडकलेल्या टूथब्रशला काढण्यासाठी गालाच्या मागच्या बाजूला एक होल केला. त्याने टूथब्रशचा अर्धा भाग बाहेर काढण्यात आला. तर टूथब्रशचा दुसरा भाग दातांमध्ये अडकला होता. त्याला काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.