
काही महिन्यांपासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाई सुरू आहे. वारंवार मागणी करूनही अनेक भागात मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज मनसे कार्यकर्त्यांसह आक्रमक पवित्रा घेत केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात घुसून आंदोलन केले. पाणीपुरवठा अधिकाऱ्याच्या खुर्चीला चपलेचा हार घालत प्रशासनाचा निषेध केला. येत्या सात दिवसांत पाणी प्रश्न संपुष्टात आला नाही तर थेट आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
कल्याण पूर्व येथील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. कमी दाबाने तसेच अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणी समस्येबाबत नागरिकांनी अनेकवेळा निवेदने, तक्रारी करूनही केडीएमसी अधिकाऱ्यांकडून आश्वासन पलीकडे कोणतीच कार्यवाही झालेले नाही. या निषेधार्थ आज मनसेचे उपशहरप्रमुख योगेश गव्हाणे यांच्यासह नागरिकांनी केडीएमसीचे ‘ड’ प्रभाग कार्यालय गाठले आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला चपलेचा हार घालत निषेध नोंदवला. येत्या सात दिवसांत दररोज दोन तास मुबलक पाणीपुरवठा झाला नाही तर थेट आयुक्त दालनात आंदोलन करण्याचा इशारा गव्हाणे यांनी दिला आहे.