नगर : गावठी कट्ट्याशी खेळताना चिमुरडा जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

राजेंद्र वाडेकर । राहुरी

घरात ठेवलेला गावठी कट्ट्याशी खेळताना चिमुरडा जागीच ठार झाला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील देहरे रोडवर असलेल्या मोरे वस्तीवर ही खळबळजनक घटना घडली. आदित्य भैरवनाथ मोरे वय (12) असे मृत मुलाचे नाव आहे.

आदित्य वांबोरी येथील महेश मुनोत शाळेतील सहावी इयत्ता मध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात खेळत असताना गावठी कट्टा त्याच्या हाती लागला. कट्ट्याचे स्ट्रीगर अक्षयने दाबताच गोळी छातीच्या उजव्या भागातील बरगडीत घुसल्याने आदित्य जमिनीवर कोसळला. गावठी कट्ट्याच्या फायरचा आवाज झाल्याने बाहेर जनावरांचे चारापाणी व्यवस्था करत असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आदित्यला पाहुन आईने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. फॉरेन्सी लॅबचे पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

या प्रकरणी मुलाची आई जया मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नवनाथ नामदेव मोरे याच्या विरूध्द घरात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.