लेखणीची साथ

42

>> स्मिता कर्णिक, मालाड

मुलं लहान असल्यापासून मी नोकरी करतेय. शिक्षिका होते मी. आता निवृत्त झाले आहे. त्यावेळी तर मालाडहून मी मुलुंडला नोकरीसाठी जायची. मराठी व हिंदी शिकवायचे. मुलुंडला लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी व हिंदी शिकवायचे. तेव्हापासूनच मला लिखाणाची खूप आवड होती. पण घरातलं काम, मुलं लहान, यजमानांची ऑफिसची तयारी करून देण्यात मला स्वतःकडे पाहायला मुळीच वेळ मिळायचा नाही. पण हळूहळू दोन्ही मुलं मोठी झाली आणि मी लेखन करायला लागले.

मुलुंडला 10 वर्षे नोकरी केली. त्यावेळी लोकलना आतासारखी खूप गर्दी नसायची. पण तरीही मला जाणं-येणं जमत नव्हतं. म्हणून ती नोकरी मी सोडली. नंतर एक वर्ष घरी राहिल्यानंतर मालाडमध्येच मालवणीच्या शाळेमध्ये लागले. तेथून दोनेक वर्षांतच दुसरीकडे म्हणजे मार्वेमध्ये नूतन विद्यामंदिरमध्ये जॉब करू लागले. त्या शाळेत 20 वर्षे केली. तेथे मी मराठी आणि हिंदी विषयांच्या विभागाची प्रमुख होते. लोकांच्या घरोघरी जाऊन शिकवण्याही केल्या. हे सगळं सांभाळून माझी लेखनाची आवड सांभाळली.

लेखन स्पर्धा असल्या की मला तेथे परीक्षक म्हणून बोलवायचे तेव्हा खूप बरं वाटायचं. गाणी म्हणण्याची आवड होती. शाळांमध्ये कार्यक्रम व्हायचे त्यात मी गायचे. कविता लिहायचे. लेख लिहायचे. अजूनही ते जपून ठेवले आहेत. आता निवृत्त झाल्यावर तशी मी मोकळी झाले आहे, पण लेखनाच्या आवडीतून मुक्त होऊ शकलेले नाही. खूप लिहिते… आता तर फेसबुक, व्हॉट्सअपसारखी माध्यमं आली आहेत. त्यात मला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला भरपूर वाव मिळतोय. वेगवेगळ्या मासिकांमध्ये मी लेख, कविता पाठवत असते. त्यातच मी माझं वेगळेपण पाहाते. नोकरी केली की महिलांना त्रास होतो पण चार लोकांसोबत उठता बसता येतं. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करता येतं असं मला वाटतं. आपल्या आवडीनिवडी दुसऱ्याशी शेअर करायला मिळतात. हातात दोन पैसे असतात. त्यामुळे आपण कुणावर अवलंबून नाही ही भावना मनाशी असते. अर्थातच त्यामुळे मन प्रसन्न राहाते.

आपली प्रतिक्रिया द्या