
मागील काही काळापासून विमानांमध्ये सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. कधी इंजिनमधून धूर तर कधी टायर पंक्चर झाल्याच्या घटना अलीकडे नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र आता केरळहून दुबईला जाणाऱ्या विमानात साप सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे. साप नेमका विमानात पोहोचला कसा हा प्रश्न सर्वांना पडला. आता या प्रकरणाची एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शनिवारी दुबई विमानतळावर पोहोचले तेव्हा त्याच्या मालवाहू होल्डमध्ये एक साप आढळला. विमानातील उड्डाण कर्मचार्यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठांना दिली. एअर इंडिया एक्सप्रेसचे B737-800 विमान केरळमधील कालिकतहून दुबईला गेले होते. दुबई विमानतळावर पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली तेव्हा त्याठिकाणी एक साप आढळला. सापाला पाहताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
यावेळी विमानतळाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले आणि सापाला बाहेर काढले. आता डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.




























































